एक सुंदर रेशीमगाठ म्हणजे मुलगी. पहिल्यांदा तिला आपल्या हातात घेतल्यापासून… ते यशस्वी तरूणी होईपर्यंत. मुलगी होणं ही अशी भावना आहे, जी शब्दांमध्ये व्यक्त करता येणं शक्यच नाही. प्रत्येक घरात मुलीचं आगमन झाल्यावर जणू एखाद्या सोहळ्यालाच सुरूवात होते. आपल्या आयुष्यात प्रकाशाची किरणं आणतात त्या मुली, आनंदाचा झरा असतात त्या मुली आणि तिच्या आगमनाने आपलं आयुष्यचं बदलून जातं. खरंतर आई-मुलगी किंवा बाप-मुलीचं नातं हे रोज साजरं करण्याचं नातं आहे. पण जागतिक स्तरावर सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी जागतिक कन्या दिन किंवा डॉटर्स डे साजरा केला जातो. या दिवशी आवर्जून कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. जर हा दिवस तुम्हाला आपल्या लाडक्या लेकींसोबत साजरा करायचा असेल तर आम्ही तुमच्यासोबत काही खास सेलिब्रेशन आयडियाज शेअर करत आहोत.
मास्टरशेफसोबत वेळ
तुम्ही आपल्या लाडक्या लेकींसोबत खास बाहेर जाऊन ब्रंच किंवा डिनर करणार असाल तर ते उत्तमच आहे. पण जर एकत्र काही डिश बनवायची आयडिया कशी वाटते? जेवणं बनवणं ही खूपच कल्पकता पूर्ण गोष्ट आहे. कारण लाडक्या लेकींना लहानपणापासून भातुकली खेळायला आवडते. त्यामुळे ती जर तिच्यासोबत एखादा सोपा करून बघायचं तिला सांगितल्यास तिला निश्चितच आनंद होईल. मग तिच्यासोबत एखादी क्युट कप केक रेसिपी करून पाहा. छानपैकी केक रेसिपी करताना तिलाही आनंद होईल आणि तिच्यासोबत नवीन काही करून पाहिल्याचं आणि वेळ घालवल्याचं समाधान तुम्हालाही नक्कीच मिळेल.
शॉपिंग शॉपिंग
आजकालच्या लहानग्या मुली शॉपिंगमध्ये अगदीच तरबेज असतात. अगदी स्वतःसाठी कोणत्या हेअरपिन्स किंवा कोणता फ्रॉक घ्यायचा हेही त्याच ठरवतात. मग डॉटर्स डे च्या निमित्ताने तिला शॉपिंगसाठी न्या. तिच्यासोबत रिलॅक्सिंग स्पा घ्या. छानपैकी हा दिवस प्लॅन करून तिला जास्तीतजास्त वेळ द्या. तिच्या आवडत्या बाहुल्या, खेळणी आणि इतर गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घ्या. एकमेंकाच्या बेस्टी होऊन भरपूर फोटो काढा. कारण आजकाल लहान मुलांना सेल्फीच काय उत्तम फोटोही काढता येतात.
केक प्रेम
कोणतंही सेलिब्रेशन हे चांगल्या केकशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे डॉटर्स डे याला अपवाद कसा असेल. मग तुम्ही घरी शक्य असल्यास छानसा केक बनवा किंवा आपल्या लेकीसाठी खास डॉटर्स डे थीमचा केक ऑर्डर करा. तिला केकबाबत आधीच सांगू नका. तिला मस्तपैकी सरप्राईज द्या आणि मग छानपैकी केक कापून जागतिक कन्या दिन आपल्या लाडकीसोबत साजरा करा.
शिकण्यातील मजा
जर तुम्हाला रोजच्या धावपळीत आपल्या लेकीला वेळ देता येत नसेल तर कन्या दिनाचा उपयोग निश्चितच तुम्हाला होईल. कारण हा दिवस रविवारी येतो त्यामुळे तुम्हीही निवांत असाल आणि तिच्याही शाळेला सुट्टी असेलच. मग या दिवसाचा वापर तुम्ही तिच्यासोबत काहीतरी नवीन शिकण्यासाठीही करू शकता. जे तिला अनेक दिवसांपासून शिकायचं असेल किंवा जे तिला तुमच्यासोबत करून पाहायचं असेल. मग ते काहीही असू शकतं जसं सायकल शिकणं, नवीन ओरेगामी आर्ट शिकणं किंवा एखाद्या गाण्यावर डान्स करणं का असेना. तिच्यासोबत तुम्हीही ते शिका आणि मग दोघीही एखादी नवीन गोष्ट एकत्र केल्यावर तिला होणारा आनंद हा निश्चितच अवर्णनीय असेल. आपल्या मुलीला आपला वेळ देणं हे निश्चितच कोणत्याही दुसऱ्या भेटवस्तूंपेक्षा अमूल्य आहे.
गिफ्ट्स गिफ्ट्स
जर तुम्हाला तिच्यासोबत जास्त वेळ घालवता येणार नसेल तर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करा आणि तिच्या आवडत्या गोष्टी तिला देऊन सरप्राईज करा. जर ती नुकतीच ऑफिस किंवा कॉलेजला जाऊ लागली असेल तर तिला एखादी छानशी पर्सनालाईज्ड डायरी द्या. तिचा फॅशन सेन्स उत्तम असेल तर तिला तिच्या आवडत्या ब्रँडची एक्सेसरी गिफ्ट करा. एक दिवस तिला बिघडवण्यात काहीच हरकत नाही.
अनाथाश्रम किंवा एनजीओला भेट द्या.
जर तुम्हाला तिला खऱ्या जगाची ओळख या दिवशी करून द्यायची असेल किंवा तिला चांगल्या कामासाठी उद्युक्त करायचं असल्यास अनाथाश्रमाला किंवा एनजीओला भेट द्या. तिच्यासोबत इतर मुलांनाही आनंद द्या. तिथल्या मुलींसोबत हा कन्या दिन साजरा करा. ज्यामुळे तिलाही अशा जगाची ओळखही होईल आणि चांगल्या गोष्टी करण्याची सुरूवातही या दिवसापासून तिला करता येईल. ज्यामुळे हा दिवस तुमच्यासाठी लाडक्या लेकीसाठी अविस्मरणीय ठरेल. तुमच्यामुळे दुसऱ्या मुलांना मिळालेल्या आनंदाने तिलाही त्यांचे आशिर्वाद मिळतील.